मुंबई | बांगलादेश-भारत एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा स्लीपमध्ये फील्डिंग करताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर रोहित मैदान सोडून उपचारासाठी बाहेर गेला. उपचार करून पुन्हा तो मैदानात आला. हे पाहून त्याची पत्नी रितिका इमोशनल झाली आणि तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली.
रोहित शर्माने 28 चेंडूवर 51 धावांची लढाऊ खेळी खेळली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताने हा सामना 5 धावांनी गमावला आणि मालिकाही गमावली. रोहितच्या या खेळीनंतर त्याची पत्नी रितिका सजदेहने तिच्या इन्स्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली. दुखापतीनंतरही रोहितच्या फलंदाजीचा स्क्रीनशॉट तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यात म्हटले की, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू जे केलेस त्याचा मला अभिमान आहे’.
कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीला आला तेव्हा भारताच्या 43 षटकांनंतर 7 बाद 207 धावा होत्या. शेवटच्या 7 षटकात टीम इंडियाला विजयासाठी 65 धावांची गरज होती. रोहित शर्माने सुरुवातीला सावध खेळ खेळला, पण एकदा आक्रमक फॉर्म घेतल्यानंतर त्याची बॅट पुन्हा थांबली नाही. रोहित शर्माने 51 धावांच्या या खेळीत 28 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार आणि 5 आकाशी षटकार ठोकले.