2025 साली चॅम्पियन्स ट्रॉफीशिवाय आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. आशिया कप स्पर्धा यावेळी टी20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. विशेष म्हणजे 2025 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात आयोजित करण्यात येणार असल्यानं भारतीय संघ स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. माक्त्र, आता 2025 साली होणारी आशिया कप ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे या घोषणेमुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय 2027 साली वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणारा आशिया चषक बांग्लादेशात आयोजित करण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आलीये.
भारतानं 2023 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. 2025 मध्ये होणारी आशिया कप स्पर्धा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. 2026 च्या टी 20 वर्ल्डकपची पूर्व तयारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय 2027 चा आशिया कप बांगलादेशमध्ये होणार असून ती स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. 2027 ला दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपची पूर्व तयारी म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.
आशिया क्रिकेट कंट्रोल कडून आशिया कप स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आशिया कप स्पर्धेत भारताचं वर्चस्व कायम राहिलं आहे. भारतानं 8 वेळा आशिया कपचं विजेतेपद मिळवलं आहे. यामध्ये 7 एकदिवसीय आणि एका टी 20 स्पर्धेचं विजेतेपद भारताला मिळालं आहे. भारतानं श्रीलंकेनं 6 वेळा विजेतेपद मिळवलेलं आहे. भारत आणि श्रीलंकेनंतर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्ताननं 2 वेळा विजेतेपद मिळवलं आहे.
पाकिस्तान भारतात येणार?
पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत घ्यावेत,असी भूमिका बीसीसीआयनं घेतली आहे. आयसीसीनं त्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. जर, भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तनला गेला नाही, तर, आगामी आशिया कपमध्ये पाकिस्तान भारतात खेळण्यासाठी येईल का प्रश्न कायम आहे.