पुणे | राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आहे. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात जुन्नर तालुक्यात प्रस्तावित असणारा बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला नेण्याच्या हालचाली करण्यात आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आता या प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द केला असून हा प्रकल्प जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण या ठिकाणीच होणार असल्याचे सांगितलं आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.
राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारने घेतलेले विविध निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून रद्द करण्याचा धडका सुरू आहे. त्यातच अजित पवारांचा आणखी एक निर्णय रद्द करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. हा निर्णय घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार शरद सोनवणे यांच्या मागणीला यश आलं आहे. बारामतीला बिबट्या सफारी प्रकल्प नेण्याचे रद्द केले आणि जुन्नरच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.
जुन्नर तालुक्यात प्रस्तावित असणारा बिबट्या सफारी प्रकल्प अजित पवार यांनी त्यांच्या काळात बारामतीला उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी १०० हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास ६० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र याविरोधात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. मात्र बारामतीमध्ये आणि जुन्नर या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प करण्यात येईल, असं पवारांकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु आता सत्ताबदल झाल्याने अजित पवार यांनी घेतलेला बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला उभारण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.