गांधीनगर | गुजरात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात आता सत्ताधारी भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यात भाजपची सत्ता आल्यास 20 लाख रोजगार देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पुढे आहे. भाजपने हे राज्य जिंकण्यासाठी देशातील आणि राज्य पातळीवरील सर्व दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी उतरवले आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने जाहीरनाम्यात अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.
गुजरातमधील तरुणांना पुढील 5 वर्षांत 20 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. तर 10,000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 20,000 सरकारी शाळांचे रूपांतर उत्कृष्ट शाळांमध्ये केले जाईल. 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने, गुजरात ऑलिम्पिक मिशन सुरू होईल आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, यांसह इतर अनेक आश्वासने देण्यात आली आहेत.