नवी दिल्ली | २ डिसेंबरपासून ट्विटर ब्लू पुन्हा लाँच करण्यात येणार आहे. तसेच युझर्ससाठी निळी, सोनेरी व राखाडी रंगाची व्हेरिफिकेशन टिक मिळणार असल्याचे एलॉन मस्क यांनी ट्विट करून सांगितले आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून सोशल मीडिया कंपनीत अनेक बदल केले आहेत. आधी ब्लू टिकसाठी पैसे आकारण्याची घोषणा झाली. आता ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार असल्याची माहिती एलॉन मस्क यांनी दिली आहे. यापुढे निळी, सोनेरी, राखाडी टिक व्हेरिफाईड ट्वीटर खात्याला मिळणार आहे. २ डिसेंबरपासून व्हेरिफाईड ट्विटर खात्यासाठी निळ्या रंगासह सोनेरी आणि राखाडी रंगाचा चेक मार्क येणार आहे. यामध्ये कंपन्यांसाठी सोनेरी, सरकार आणि सरकारी संस्थांसाठी राखाडी मार्क असणार आहे तर इतरांसाठी निळ्या रंगाची टिक मिळणार आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे.
एलॉन मस्क नवीन बदलांसह त्यांची ट्विटर ब्लू सेवा पुन्हा लाँच करणार आहेत. पडताळणीसाठी २ डिसेंबरपासून ट्विटर ब्लू ही कंपनीची प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवा पुन्हा लाँच करणार आहे असे मस्क म्हटले आहे. कंपन्यांसाठी सोनेरी चेक मार्क, सरकारसाठी राखाडी चेक मार्क आणि व्यक्तींसाठी (सेलिब्रेटी किंवा सामान्य) निळा चेक मार्क जारी करेल. दरम्यान, चेक मार्क सक्रिय होण्यापूर्वी सर्व सत्यापित खाती मॅन्युअली प्रमाणीकृत केली जातील.यापूर्वी निळा चेक मार्क राजकारणी, सेलिब्रिटी, पत्रकार आणि इतर सार्वजनिक व्यक्तींच्या सत्यापित खात्यांसाठी राखीव होता. परंतु पैसे देण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी ट्विटरच्या कमाईला मदत करण्यासाठी सदस्यता पर्याय या महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आला होता.
दरम्यान, मस्कने ट्विटरच्या नुकत्याच जाहीर केलेल्या $8 (अंदाजे रु.६५०) ब्लू चेक सबस्क्रिप्शन सेवेला विराम दिला. याचे कारण बनावट खाती वाढली आणि ट्विटरची ब्लू चेक सबस्क्रिप्शन सेवा पुन्हा सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.