बेळगाव | कन्नड संघटनांकडून हिरे बागेवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आता संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय नेतेमंडली देखील आक्रमक झाले आहे. यामध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी देखील ट्वीटद्वारे आपली प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला आहे.
त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत, त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल असा इशारा त्यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. राज्य सरकार डोळे मिटून बसलं आहे. स्वाभिमान, अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, आपल्या लोकांविषयी प्रेम आहे की नाही. पुण्यात शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांना शिंदे-फडणवीस सरकारचे पोलीस लाठ्या काठ्यांनी मारहाण करत आहेत. कोल्हापुरातही तेच सुरु आहे. तुम्ही कोणाचं काम करत आहात, असा प्रश्न राऊत यांनी राज्यसरकारला केला आहे.
त्याचबरोबर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ते स्वत: बेळगावात जाणार असे म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत राऊत म्हटले, या घटनेनंतर सरकार काय करत आहे. मुख्यमंत्री कुठे आहेत? जे सांगतात आम्ही त्या काळात बेळगावात जाऊन लाठ्या-काठ्या खाल्या. जर तुम्ही सीमाप्रश्नासाठी लाठ्या खाल्या आहेत, तर आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहेत, त्या खुर्चीवरून महाराष्ट्राचा कर्नाटकने केलेला अपमान तुम्ही पाहिला नसता असा टोला देखील त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’वर बोलवले आहे. त्यानुसार, आता मंत्री वर्षावर यायला देखील सुरुवात झाली आहे. यामध्ये बेळगाव सीमा विवादावर सुरु असलेला सर्वोच्च न्यायालयातील खटला, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा, मंत्र्यांचे बेळगावमध्ये जाणे आदी गोष्टींवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.