मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर आहे. तर आम आदमी पक्षासह काँग्रेसचा दारूण पराभव होताना दिसत आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘लोकसभेच्या निवडणुकीत गुजरातमधूनच तुम्हाला देशाच्या सत्तेचे परिवर्तन पाहायला मिळेल. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही बघाल, भाजपला हेच गुजरात त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही’.
काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला गुजरात विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. या राज्यात भाजपने मुंसडी मारली आहे. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला काँग्रेसने धक्का दिला. तिथे भाजपची सत्ता असतानाही आता परिवर्तन घडत आहे. त्यामुळे काँग्रेसला कोणाचीही डोकेदुखी झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत गुजरातमधूनच तुम्हाला देशाच्या सत्तेचे परिवर्तन पाहायला मिळेल.
दरम्यान, आम आदमी पक्ष कोणाची बी टीम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला आता त्यावर काही बोलायची गरज नाही, असे म्हणत त्यांनी आम आदमी पक्षाच्या कामगिरीवर बोलण्याचे टाळले.
निवडणुका आमच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत
राहुल गांधी यांनी सर्व चुकीच्या गोष्टींविरोधात भारत जोडो यात्रा काढली. निवडणुका येतात, जातात. संविधान वाचवणं महत्त्वाचे आहे. कोरोना असतानाही भाजप निवडणुकांच्या मागे लागले होते. पाच वर्षांनी पुढे पुन्हा निवडणुका येतील. निवडणुका आमच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.