मुंबई | संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येत आहेत. त्यात भाजपने गुजरातचा गड राखत काँग्रेस आणि ‘आप’चा सुपडासाफ केला. या निकालावर मात्र शिवसेनेचे (उ.बा.ठा.) खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. भाजप आणि आम आदमी पक्षात साटंलोटं झाल्याचा आरोप त्यांनी केला.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले, ‘तीन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या. बुधवारी (दि.7) दिल्ली महानगरपालिकेतील 15 वर्षांची सत्ता ‘आप’ने खेचून घेतली. बसप आणि एमआयएमकडून मतविभागणी झाली नसती तर ‘आप’ला चांगलं यश मिळालं असतं. तरीही देशाच्या राजधानी दिल्लीत ‘आप’ला जे यश मिळालं ते कौतुकास्पद आहे. दिल्लीत 15 वर्षांची भाजपकडून खेचून घेणं सोपं काम नाही.’
तसेच ‘दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा’, असं भाजप आणि आपमध्ये साटंलोटं झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. तसेच तीन विरुद्ध एक असा हा सामना झाला आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.