पुणे | सामान्य गृहिणी म्हणून चार भिंतींच्या आत चूल आणि मूल सांभाळणे या चौकटीच्या बाहेर जाऊन पुण्यातील महिला गिर्यारोहक सुविधा कडलग या जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्यास सज्ज आहेत. त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने कडलग यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
दोन मुलांची आई ते यशस्वी गिर्यारोहक असा सुविधा कडलग यांचा प्रवास रंजक आहे. लहानपणापासूनच साहसी खेळाचे वेड असणाऱ्या सुविधा कडलग यांचं मन कायमच निसर्गाच्या विविध छटांचा आणि गडकिल्ल्यांचा कानोसा घेत राहिले. लग्नानंतर २०१४ साली सिंहगड येथे प्रथम ट्रेकिंग करताना प्रथम क्रमांक पटकावला आणि परत त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
सामान्य कुटुंबातील दोन मुलांची आई असणाऱ्या सुविधा कडलग यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत २६ ऑगस्ट २०२१ रोजी माउंटन कांग्यत्से (६२५० मीटर) आणि ३० जुलै २०२२ रोजी माउंटन नुन (७१३५ मीटर) शिखर सर करण्याची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. सहा वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर आता त्यांना जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट खुणावत आहे.
विशाल हिमतीची माणसं या शिखराला गवसणी घालत असतात. आपल्या मराठी मातीतही असे एव्हरेस्टवीर आहेतच. पण गरज आहे ती आपल्या पाठबळाची. सामाजिक दायित्व निभावणाऱ्या आपल्या दातृत्वाची भावना एक महिला गिर्यारोहकाला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील ही आधुनिक हिरकणी देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी एव्हरेस्टवर मराठी झेंडा फडकवायला सज्ज आहे. गिर्यारोहण हा खेळ समाजात रुजवण्याचा ध्यास बाळगलेल्या सुविधा कडलग यांच्या असीम धैर्याची आणि परिश्रमांची ही गाथा नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. अधिक माहितीसाठी 7030333999 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन सुविधा कडलग यांनी केले आहे.