मुंबई | मनसे नेते मनोज चव्हाण यांनी आदेश बांदेकर यांच्यावर नवा आरोप केला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढली जाते. परंतु यावर्षी ती काढण्यात आलेली नाही. या डायरीवर आदेश बांदेकरांना उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा आहे असा आरोप चव्हाणांनी केला. दरम्यान, यावर प्रत्युत्तर देताना बांदेकर यांनी खर्च टाळण्यासाठी दैनंदिन डायरी छापली नाही असं म्हटलं आहे. बांदेकरांच्या या उत्तरावर मनोज चव्हाणांनी आज पुन्हा ट्वीट करत प्रश्न उपस्थित केला आहे. डायरी छापली नाही मग निविदा का काढली? आदेश बांदेकरांना अध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार नाही असंदेखील या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.
सिद्धिविनायक मंदिर न्यास कडून अनागोंदी कारभार झाल्याचं मनसेने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. त्यानंतर इतकी गडबड करून निविदा खुली सुद्धा केली आणि हे काम स्नेहा प्रिन्ट्स सर्व्हिसला दिले. इतके होऊन सुद्धा फक्त उद्धव ठाकरे यांच्या फोटोसाठी डायरी प्रिंटींग थांबवून ठेवली. या खोटारड्या माणसाला देवस्थानाच्या मंडळ अध्यक्ष पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. यावर बांदेकरांनी उलट प्रतिक्रिया द्यावीच मी याबाबतीत अजून कागदपत्रं जाहीर करतो असा थेट इशारा देखील त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर न्यास यांच्या कथित अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी मनसेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.