नवी दिल्ली | ”शेतकऱ्यांचा, मजुरांचा जो काही पैसा आहे तो थेट त्यांच्या मालकाच्या खिशात जातो. हे नरेंद्र मोदींचे सरकार नसून अंबानी आणि अदानींचे सरकार आहे”, अशा शब्दांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हल्लाबोल केला. तसेच देशातील छोट्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांना अडचणीत टाकले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी लाल किल्ल्याजवळ भाषण करताना नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी राहुल गांधींनी चीनसोबतच्या संघर्षापासून ते आर्थिक मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या सरकारच्या काळात देशात द्वेषाचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, ”हिंदू-मुस्लिम यांच्यात 24 तास द्वेष पसरवला जात आहे. मात्र, देशाचे वास्तव यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. सरकार लक्ष विचलित करण्यासाठी हे मुद्दे आणत आहे”.
दरम्यान, मी जेव्हा चालायला सुरुवात केली तेव्हा मला या रस्त्यांवर लाखो लोक भेटले. आजकाल हिंदू-मुस्लिम फाटाफूट मीडियात सतत चालवली जात आहे. पण हे वास्तव नाही. देशातील सर्वसामान्य नागरिक हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन एकमेकांचा आदर करतात, असेही त्यांनी सांगितले.