मुंबई | सध्या बॉक्स ऑफिसवर रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट धुमाकूळ घालत आहे. त्यातच आता रितेश देशमुखने चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच २० जानेवारीपासून ‘वेड’ चित्रपटाचं नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात येणार आहे. म्हणजेच चित्रपटातील एडिट केलेले काही सीन या चित्रपटात दाखवून ‘वेड’ पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
यामध्ये, श्रावणी व सत्याची भूमिका साकारणारे कलाकार यांचं एक रोमॅंटिक गाणंही चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तसंच चित्रपटाच्या शेवटी दिसणारं सलमान खान व रितेशचं गाणंही चित्रपटाच्या मध्यभागात या नवीन व्हर्जनमध्ये दाखविण्यात येणार आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव चित्रपटात हे बदल केले असल्याचं रितेशने आपल्या इन्टाग्राम पोस्टमार्फत सांगितले आहे.
त्याचबरोबर, रितेशने ‘वेड’ चित्रपटाबाबत आणखी एक घोषणा केली. २० जानेवारीला सिनेमा लव्हर्स डे सेलिब्रेट करण्यात येणार असल्यामुळे सगळे चित्रपट ९९ रुपयांत पाहता येणार आहेत. त्यामुळे वेड चित्रपटाचं तिकिटंही अवघ्या ९९ रुपयांत मिळणार असल्याचं रितेशने सांगितलं आहे.
दरम्यान, या चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. लवकरच ५० कोटींचा टप्पा हा चित्रपट गाठेल असा अंदाज आहे.