पुण्यामध्ये सध्या कसबा पेठ पोटनिवडणुकीचा रणसंग्राम चालू आहे. एका बाजूला मविआ तर दुसऱ्या बाजूला शिंदेगट आणि भाजप आहे. कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा थेट सामना आहे. भाजपला जिंकवण्यासाठी आता शिंदेगट ही मैदनत उतरला आहे.
पुण्यात काल शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला भरत गोगावले, शीतल म्हात्रे, खासदार श्रीरंग बारणे, नरेन म्हस्के, आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष नाना भानगिरे इत्यादी उपस्थित होते. या वेळेस बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पदाधिकऱ्यांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांचा उल्लेख पेंग्विन असा केला.
मुख्यमंत्र्यांना वरळीतून सातत्याने आव्हान देणारे आदित्य ठाकरे यांच्या विषयी शीतल म्हात्रे यांनी यावेळी एक गौप्यस्फोट केला आहे. त्या म्हणाल्या, “आदित्य ठाकरेंना निवडून आण्यासाठी दोन आमदारांचा बळी द्यावा लागला”. यावेळेस कोणत्या दोन आमदारांचा बळी दिला असे विचारले असता त्यांनी “सचिन अहिर आणि सुनील शिंदे या दोन आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी बळी दिला”, असा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पुण्यात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केला.