मुंबई | महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरणारा दिवस म्हणजे 21 जून 2022. कारण याच दिवशी सत्तासंघर्ष सुरू झाला. आणि याच सत्तासंघर्षाचा आज तब्बल 10 महिन्यांनंतर निकाल लागणार आहे. हा निकाल एकमताने दिला जाण्याची आणि फक्त सरन्यायाधीश चंद्रचूड या निकालाचं वाचन करण्याची शक्यता आहे.
या निकालावर केवळ महाराष्ट्राचच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. त्यामुळे शिवसेनेसह ठाकरे गटाची देखील धाकधूक वाढलीय. अचानकपणे घडलेल्या या सत्तानाट्याने महाराष्ट्राचा राजकीय पटच बदलून टाकला.
उद्धव ठाकरेंशी खेळी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. मात्र आता कोर्ट शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांना पात्र ठरवणार की अपात्र? या प्रश्नाच उत्तरं आज मिळणार आहे. केवळ ठाकरे गट आणि शिवसेना यांचच याकडे लक्ष नाही तर राज्यातील प्रत्येक पक्षाचे याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी सूरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर संपूर्ण भारतात आजही चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल यांची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.