पुणे | राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. बदलत्या काळासोबत स्वतःला बदलून घेत एसटी महामंडळाने प्रवाशांना तिकीट देण्यासाठी नवीन अॅड्राँईड मशिन आणली आहे. यामुळे एसटीचा प्रवास करताना आता रोख पैसे नसले तरीही घाबरायची गोष्ट नाही. कारण राज्यात तब्बल ३४ हजार वाहकांना नवीन अॅड्राँईड, तिकीट इशू मशिन ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत देण्यात येणार आहे.
त्यामध्ये बसप्रवाशी एसटी तिकिटाचे पैसे देण्यासाठी एटीएम, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, यूपीआय, क्यूआर कोड चा वापर करू शकणार आहेत. त्यामुळे यापुढे सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद, पैशांची चोरी सारख्या घटना नक्कीच कमी होतील. एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना तसेच वाहकांना होणारी सुट्या पैशांची अडचण हा एक कळीचा मुद्दा होता सरकारने हा निर्णय घेऊन यावर छान तोडगा काढला आहे.
सरकारचा हा निर्णय प्रशंसनीय आहे. सध्या सर्व काही डिजिटलच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डिजिटल व्यवहाराला चालना देण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय डिजिटल इंडिया च्या मोहिमेत एक मोठा वाटा उचलेल. तसेच मोबाईलवरून डिजिटल पेमेंट करणे सोपे असल्याने प्रवाशांसाठी सुद्धा हे सोयीस्कर होईल.
बदलत्या काळानुसार एसटीची सेवाही बदलावी, या हेतूने एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या संकल्पनेतून एसटी महामंडळाने हा नव्या दमाचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबाजावणी नीट झाली तर महाराष्ट्राची लालपरी लवकरच डिजिटल परी होऊ शकते.
एसटी महामंडळाकडे नवीन कंपनीच्या करारानुसार ३४ हजार वाहकांना नवीन अॅड्राँईड मशिन देण्यात येतील. त्यामध्ये साताऱ्यासाठी १७०२, सांगली १६७४, कोल्हापूर १७५२, सोलापूर २०५८, नांदेड १२९०, बीड ११७२, परभणी १०२४, पालघर १११३, रत्नागिरी २०२९, जळगाव १९८६, पुणे १७२०, वर्धा ५९९, रायगड ९५१, सिंधुदुर्ग ९५३, अमरावती १०५८, नाशिक २२२८, अहमदनगर १४३८, नागपूर १०८२, मुंबई २०२, ठाणे १६५२ इतक्या मशिन संबंधित एसटीच्या विभागांना देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लिंक –