पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी त्यांच्यासंबंधीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे अभ्यासू, कर्तृत्त्ववान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेलं दमदार नेतृत्त्व होय, असे सांगून संजय काकडे यांनी फडणवीस यांची ओळख कशी झाली? त्यांच्या राजकीय वाटचालीत गेल्या ८ वर्षांत काय काम केले आणि कसे केले यासंबंधीच्या आठवणी सांगितल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची मैत्री निखळ व स्वच्छ असल्याचे सांगून संजय काकडे यांनी त्यांच्यासोबत ओळख कशी झाली हे देखील सांगितले आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी फडणवीस यांच्यासोबत ओळख झाली. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे फडणवीस यांची ओळख झाली आणि पुढे त्याचं रुपांतर मैत्रीत झालं.
संजय काकडे हे २०१४ साली राज्यसभेवर अपक्ष म्हणून बिनविरोध निवडून गेले. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले. या दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये झालेल्या पुणे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघात भाजपाच्या विजयासाठी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावता आल्याचा उल्लेख त्यांनी केला.
त्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत जिथं भाजपाची ताकद नाही अशा ठिकाणी भाजपाचे नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी फडणवीस यांनी त्यांच्यावर सोपवली. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही मोहिम फत्ते केली आणि सर्वाधिक ९८ नगरसेवक जिंकून आणले. इतिहासात पहिल्यांदाच पुणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकल्याची आठवण संजय काकडे यांनी सांगितली आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कोथरुड विधानसभा मतदार संघात विशेष लक्ष देण्यासाठी सांगितले होते आणि या तिन्ही ठिकाणी भाजपाच्या विजयासाठी आपण काम केले आणि विजय मिळवून दिल्याचे ते म्हणालेत.
फडणवीस यांच्या राजकारणातील प्रवासाचे कौतुक करतानाच काकडे यांनी त्यांच्या अभ्यासूपणामुळे विरोधी पक्षातील भल्या भल्या मंत्र्यांना सभागृहातील चर्चेवेळी घाम फुटत असल्याचेही सांगितले. २०१४ मध्ये महायुतीचे महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री झाल्याची घटनाही त्यांनी सांगितली.
फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई ते नागपूर दरम्यानचा समृद्धी महामार्ग, मुंबईतील कोस्टल रोड, जलयुक्त शिवार योजना व वृक्ष संवर्धन, मुंबई, पुणे, नागपूर याठिकाणी मेट्रोचं जाळं, २४ तास समान पाणी पुरवठा योजना, पुरंदरचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चांदणी चौकातील उड्डाणपूल, कात्रज-कोंढवा रस्ता, स्मार्ट सिटी अशा अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या, असेही संजय काकडे यांनी म्हटले आहे.
फडणवीस यांच्या तळमळीनं काम करण्याच्या वृत्तीचा आणि अभ्यासूपणाचा उपयोग महाराष्ट्राच्या कल्याणासाठी होवो. त्यांच्या हातून राष्ट्राची-महाराष्ट्राची सेवा घडो आणि यासाठी त्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळो! अशा शब्दांत संजय काकडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.