नवी दिल्ली | आज राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसची व्हीआयपी संस्कृती तसेच अनेक मुद्यांवरून प्रश्न उपस्थित केला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांनी नोकऱ्यांमधील आरक्षणाला विरोध केला होता आणि नेहरूजींचे भाषण आणि त्यांचे शब्द काँग्रेससाठी मूल्यवान आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नष्ट करण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत बोलताना केला आहे.
त्याचबरोबर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात एनडीए देशात 400 जागा जिंकेल असं म्हटलं होतं ते ऐकून त्यांना आनंद झाला. काँग्रेसने येत्या निवडणुकीत 40 जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होतील, ते आज आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली..आपल्या भाषणादरम्यान एनडीए सरकारने एससी, एसटी आणि ओबीसींसाठी केलेल्या विकासकामांची देखील गणना केली.
लाल दिव्याची संस्कृती का सुरू ठेवली, काँग्रेसने ब्रिटिश कायदा का बदलला नाही, काँग्रेसने देशाची मूळ संस्कृती दाबण्याचे काम केले आहे असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, नेहरूंना आरक्षण आवडत नव्हते. ते नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात होते. काँग्रेस पक्षाच्या आजच्या स्थितीला काँग्रेस पक्षच जबाबदार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.