अहमदनगर | लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना भाजपने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी डॉ. सुजय विखे पाटलांनी माफी मागितली त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे.
डॉ. सुजय विखे पाटलांनी माफी मागितली पण नेमकी कुणाची नगरच्या जनतेची की राम शिंदेंची अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये उमेदवारीसाठी प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यासह विखे पाटील पिता-पुत्रावर नाराज असलेले पदाधिकारी देखील उपस्थित होते.
सुजय विखे यांचा उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल चौधरी आणि राम शिंदे यांनी सत्कार केला. या सत्काराला उत्तर देत असताना सुजय विखे यांनी मागील पाच वर्षांमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील आणि कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाला असेल तर, मी जाहीरपणे माफी मागत असल्याचं म्हटलं आहे.
सुजय विखेंनी माफी मागितली, पण नेमकी कुणाची?
सुजय विखेंना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजप आमदार राम शिंदे हे सतत लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे म्हणत होते तर कधी राम शिंदे हे संभाव्य विरोधी उमेदवार निलेश लंके यांच्या स्टेजवर देखील पाहायला मिळाले. अनेक वेळेला सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यामुळे सुजय विखेंनी येऊ घातलेल्या निवडणुकीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून राम शिंदेंची अप्रत्यक्षपणे माफी मागितल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना आमदार राम शिंदे यांनी सुजय विखे कशाबद्दल माफी मागत आहेत हे त्यांनाच माहिती आहे. पाच वर्षात ज्या चुका केल्या आहेत, त्या जाणीवपूर्वक केल्या आहेत की नाही हे देखील त्यांनाच माहित आहे, असं म्हटलं आहे.