मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर केले आहेत. यातील पाच लोकसभा मतदार संघात अशी परिस्थिती आली आहे की, एकेकाळी एकाच शिवसेना पक्षात असलेले शिवसैनिक बंड झाल्यानंतर निर्माण झालेल्या दोन वेगवेगळ्या पक्षातून एकमेकांच्याच समोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक खास असणार आहे.
नेमक्या कोणत्या मतदार संघात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार एकमेकांना भिडणार आहेत ते जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा.
एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी एकत्रच असलेले शिवसैनिक बंडानंतर दोन पक्षात विभागले गेले. मूळ शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं तर, उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगाकडून मिळालं. बहुतांश आमदार व खासदार शिंदेंसोबत गेले तर, मोजकेच उद्धव ठाकरेंसोबत राहिले. परंतु, शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं वारंवार दिसून आलं. आता पहिल्यांदाच या दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघापैकी महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १७ जागांवर त्यांचे उमेदवार घोषित केले आहेत. तर, महायुतीत असलेल्या शिवसेनेने ८ जागांवर उमेदवार जाहीर केलेत. यातल्या पाच लोकसभा मतदार संघात या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांना भिडणार आहेत. त्यातून कोणाकडे शिवसेनेची खरी ताकद आहे हे देखील स्पष्ट होईल.
‘या’ पाच लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना एकमेकांना भिडणार
मुंबई दक्षिण मध्यमध्ये शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते या मतदार संघातून दोन टर्म खासदार राहिले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेने मावळ लोकसभा मतदार संघातून २०१४ आणि २०१९ मध्ये खासदार राहिलेले श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी दिली आहे.संजोग वाघेरे पाटील यांनी डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहे त्यामुळे आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेतून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोखंडे हे देखील दोन टर्म खासदार राहिले आहेत त्यामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात ठाकरेंकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदार संघातून विजयी झाले होते.
बुलढाणा लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षातून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. प्रतापराव जाधव हे २००९ पासून इथं खासदार आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रा. नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नरेंद्र खेडेकर हे या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख असा प्रवास करत बुलढाणात जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
हिंगोली लोकसभा मतदार संघातून शिवसेनेतून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नागेश पाटील आष्टेकर यांना संधी देण्यात आली. हदगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 मध्ये विजय मिळवला होता.
हे आहेत ते पाच लोकसभा मतदारसंघ जिथं निवडणूक रंजक आणि अटीतटीची असणार आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार असल्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदार संघावर लागलं आहे.