लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघात मतदान पार पडलं. यामध्ये नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता.नगर दक्षिणसाठी सरासरी 63.77 तर, शिर्डीसाठी 61.13 टक्के मतदान झाले.या दोन्ही मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली असल्याचं बोललं जातंय..आता ही कमी टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार ? २०१९ ला किती टक्के मतदान झालं होतं.या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ..
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 64.26 टक्के मतदान झाले होते. यंदा यात अर्ध्या टक्क्यांची घसरण होऊन 63.77 टक्के मतदान झाले. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 64.54 टक्के मतदान झाले होते. यंदा यात साडेतीन टक्के मतदानाची घसरण नोंदवली जाऊन 61.13 टक्के मतदान झाले.मतदानाचा टक्का घसरल्याने नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा या दोन्ही मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांच्या तंबूत चिंतेचं वातावरण आहे. नगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार डाॅ. सुजय विखे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके तर, शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या प्रमुख उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरल्याचं बोललं जातंय..
राजकीय नेते विकासाच्या मुद्द्यावर कमी पण राजकीय कुरघडी, आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांवर सभेतून चिखलफेक करताना दिसून आले. खरी शिवसेना की नकली शिवसेना यावरच शिवसनेच्या दोन्ही गटांचा बराचसा वेळ गेल्याचं चित्र दिसून आलं..आतापर्यंत या निवडणुकीत एक एक करत चार टप्पे पूर्ण झाले आहेत. मात्र चार ही टप्प्यात टक्केवारी बघितली तर ती कमीच दिसून आली आहे. पहिल्या टप्प्यात ६३. ७० टक्के, दुसऱ्या टप्प्यात ५३. ७१ टक्के मतदान झालं, तिसऱ्या टप्प्यात ६१. ४० टक्के मतदान झालं आणि चौथ्या टप्प्यात ५९. ६४ टक्के इतकं मतदान झालं..चारही टप्प्यांतील मतदानाची ही सरासरी आकडेवारी आहे. यात थोडा फार फरक दिसून येऊ शकतो. पण सरासरी आकडेवारीचा जरी विचार केला तरी ते कमीच दिसून येतंय. नगर जिल्हयात काय गैरप्रकार घडले ते समोर आलेच आहेत आणि त्यामुळे कमी झालेल्या मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार नगर दक्षिणमधून निलेश लंके की डॉ. सुजय विखे आणि शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे की सदाशिव लोखंडे हे समजून येण्यासाठी आपल्याला ४ जून ची वाट पाहावी लागणार आहे.