पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात प्रस्ताव मांडल्यानंतर भाजपा नेते ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाद्वारे १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार काँग्रेसचे आठ वेळा खासदार राहिलेले कोडिकुनिल सुरेश यांचा आवाजी मतदानाने पराभव केला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले…सलग दुसऱ्यांदा ते लोकसभेचे अध्यक्ष झालेत.पण भाजपने लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांचीच पुन्हा निवड का केली? यामागं नेमकं कारण काय? भाजपाचा फ़ायदा काय? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात..
राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपची पहिली पसंती ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि मंत्रिमंडळ स्थापनेनंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा झाली पण ओम बिर्ला यांचं नाव आघाडीवर राहिलं. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने अनेक माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. त्यामुळे ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाची खुर्ची पुन्हा मिळणार असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट झालं. याचं प्रमुख कारण म्हणजे बिर्ला यांच्या कामावर भाजपचं नेतृत्व पूर्णपणे समाधानी होते. लोकसभा अध्यक्षपदाच्या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात, सभागृहाचं कामकाज चांगल्या पद्धतीने चालवणारे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे म्हणून ओम बिर्ला यांची प्रतिमा निर्माण झाली. आणि आता सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष बनून ओम बिर्ला यांनी आपल्या नावावर नवा विक्रम केला आहे. सलग पाच वर्षे लोकसभेचे अध्यक्ष राहिल्यानंतर दुसऱ्यांदा अध्यक्ष बनलेले ते देशातील दुसरे खासदार ठरले आहेत. सलग दोनदा निवडून आलेले आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणारे बलराम जाखड हे एकमेव लोकसभा अध्यक्ष आहेत. जीएम बालयोगी, पीए संगमा यांसारखे दिग्गज नेते देखील दोनदा लोकसभा अध्यक्ष झाले असले तरी त्यांनी पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. बलराम जाखड यांनी 1980 ते 1985 आणि 1985 ते 1989 या कालावधीत लोकसभा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ पूर्ण केला.
ओम बिर्ला यांनी 2003 मध्ये कोटा विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्री शांती धारीवाल यांचा 10,101 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी कोटा दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राम किशन वर्मा यांचा 24,252 मतांनी पराभव केला. 2013 मध्ये त्यांनी कोटा दक्षिणमधूनच निवडणूक जिंकली. पुढे 2014 मध्ये भाजपने कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघातून ओम बिर्ला यांना खासदारकीचं तिकीट दिलं आणि बिर्ला यांनी काँग्रेस पक्षाचे खासदार इज्यराज सिंह यांचा २ लाख ७८२ मतांनी पराभव केला. 2019 मध्येही बिर्ला याच जागेवरून खासदार झाले. आणि आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील ते याच मतदारसंघातून विजयी झाले आहेत.लोकसभेत मायक्रोफोन बंद झाल्यामुळे ओम बिर्ला प्रसिद्धीच्या झोतात आले होते. 2023 मध्ये राहुल गांधी जेव्हा लोकसभेत बोलत होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांना मित्र म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. या नंतर सत्ताधारी पक्षात खळबळ उडाली होती. यानंतर जेव्हा राहुल गांधी आपलं भाषण संपवून आसनावर बसले तेव्हा ओम बिर्ला म्हणाले होते की, ‘स्पीकर साहेबांनी माईक बंद केला असं कोणीही बाहेर म्हणू नये, ही चांगली गोष्ट नाही.अनेक खासदारांनी त्यांच्या भाषणाचा कालावधी कमी केल्याबद्दल तक्रार केली असताना, बिर्ला हे पहिले अध्यक्ष होते. बिर्ला यांना खासदारांना त्यांच्या भाषणांच्या क्लिप्स सोशल मीडियावर प्रसारित करण्याची परवानगी दिली. त्यांनी चर्चेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विधेयके किंवा धोरणांवर खासदारांसाठी ब्रीफिंग सत्रांची एक नवीन प्रणालीदेखील सुरू केली. ब्रिटिश वसाहतकालीन इमारतीतून संसदेचं नवीन इमारतीत स्थलांतर, हे बिर्ला यांच्या पहिल्या कार्यकाळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. ओम बिर्ला यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पहिल्या कार्यकाळात, म्हणजे 17 व्या लोकसभेत अनेक महत्त्वाचे कायदे पारित केले.