राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड सुरु आहे. मंत्री छगन भुजबळ हे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेटिंग वर आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चाना उधाण आलंय. राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असं छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचं नाव न घेता म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीवर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार आणि छगन भुजबळ भेटत आहे. महाराष्ट्रात सामाजिक घडामोडी होत आहे. त्याला अनुसरून ही भेट असू शकते. आजच्या भेटीनंतर भुजबळ स्वतः भेट का होती हे स्पष्ट करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. भुजबळ हे महायुतीचे मोठे नेते आहेत. महायुतीला नुकसान होईल असं कोणतंही पाऊल ते उचलणार नाहीत. शरद पवार यांना भेटणं यात काहीही गैर नाही. आम्हीही अनेक वेळेला त्यांना भेटतो. भुजबळ कुठलाही निर्णय घेतील, असं मला वाटत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच, महायुती विधानपरिषद निवडणुकीत एकत्रित राहिली म्हणून मोठा विजय मिळाला आहे. भविष्यातही आम्ही एकत्रित राहू आणि विजय मिळवू. चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद करतील. जनतेला डबल इंजिन सरकार हवंय, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.