२०२४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला चांगलाच फटका बसला. वर्षभरापूर्वी अजित पवारांना सोबत घेतल्यानं महायुतीची ताकद वाढणं अपेक्षित होतं. मात्र, याउलट राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानं निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा शरद पवारांना झाल्याचं पहायला मिळालं. अशा परिस्थितीत अजित पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठा पराभव स्विकारावा लागला. पक्ष आणि चिन्ह स्वतःच्या ताब्यात घेतल्यानंतर थेट निवडणुकीत झालेला हा पराभव अजित पवारांना बॅकफूटवर घेऊन जाणारा ठरला. असाच फटका पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये यासाठी आता अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसल्याचं पहायला मिळतंय. आणि यासाठीच्या प्रचाराचा श्रीगणेशा अजित पवारांच्या बालेकिल्यातून अर्थात बारामतीतून करण्यात आला.
लोकसभेत अजित पवार यांनी ५ जागा लढवल्या त्यापैक्की मात्र त्यांना फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. बारामती लोकसभा मतदार संघातून त्यांनी थेट आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवलं होत, पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा १ लाख ५८ हजार ३३३ इतक्या मतांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामतीची निवडणूक हि सर्वात प्रतिष्ठेची लढाई होती. पण या प्रतिष्ठेच्या लढाईत अजित पवार यांच्या पदरी निराशा आली. पक्षफुटीनंतर मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा शरद पवार यांना झाला. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, मी कुठेतरी कमी पडलो, हा पराभव स्वीकाराणं माझ्यासाठी फार कठीण आहे. लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या दादांनी विधानपरिषद निवडणुकीत पॉवरफुल कमबॅक केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत निवडून आले. विधानपरिषदेत मिळालेल्या विजयानंतर आगामी विधानसभा निवडणूकित विजय मिळवणं देखील अजित दादांसाठी महत्वाचं असणार आहे. यासाठी अजित पवार आत्ता पासूनच तयारीला लागलेत. बारामतीमध्ये अजित पवार यांनी जनसन्मान मेळाव्याचं आयोजन केलं. या जनसन्मान मेळाव्यामध्ये अजित पवार काय बोलणार याची चर्चा जोरदार सुरु होती.विधानसभा निवडणुकीचं रणशिंग बारामतीमधून फुंकणार का..याची चर्चा सर्वत्र होती. मात्र जनसन्मान महामेळाव्यात अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबतचं वक्तव्य करण टाळलंय.निवडणुकीबद्दल काही न बोलल्याने चर्चा होतीये ती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणाची.बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेमध्ये अजित पवार यांनी भाषण केले होते या भाषणात अजित दादांनी असं म्हटलं होतं कि, लोकसभेला निवडून दिलं नाही तर बारामतीमधून मी विधानसभा लढवणार नाही.मात्र लोकसभेला अजित पवारांना पराभव स्वीकारावा लागला.अजित पवार यांनी बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढवली नाही तर त्याऐवजी पार्थ पवार किंवा जय पवार निवडणुकीसाठी बारामतीमधून उभे राहतील अशी चर्चा आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे जर अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही तर जय पवार किंवा पार्थ पवार हे विधानसभेची निवडणूक लढवतील त्यामुळे पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे.अजित पवारांनी लोकसभेला केलेल्या वक्तव्यात बदल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल.बारामतीमध्ये झालेल्या जनसन्मान मेळाव्यात अजित पवारांनी सरकारी योजनांबद्दल भाष्य केलं तसंच लोकसभेला विरोधकांनी आमच्या विरोधात खोटा प्रचार केला ४०० पार झाले तर संविधान बदलतील असा खोटा प्रचार आमच्याविरोधात करण्यात आला. मी जो शब्द देतो तो पूर्ण करतो. कुणी गैरसमज निर्माण केले तर आमचा महायुतीवर विश्वास आहे असं सांगा, असं अजित पवार यांनी या मेळाव्यात म्हटलं. पण या सगळ्यात चर्चा होतीये ती अजित पवार यांनी पावसात केलेल्या भाषणाची.. जनसन्मान मेळाव्यात अजित पवार यांनी भर पावसात भाषण केलं.. याआधी शरद पवार यांनी देखील पावसात भाषण केलं आणि याचाच फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भर पावसात भाषण केलंय पण याचा फायदा त्यांना होणार का?हे पाहावं लागेल.