देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए चं सरकार केंद्रात आलं. आणि या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. त्यामुळं साहजिकच त्यांच्याकडं असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नवीन चेहरा येणार हे स्पष्ट होतं. त्यानुसार अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती निवडण्यासाठी समितीदेखील गठित करण्यात आलीय. समितीकडून काही नावांची शिफारस झालीय. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्या नावांना पसंती मिळाली नसल्यानं इतर नावांचा शोध सुरु असल्याची चर्चा आहे. याच चर्चेतून आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चा सुरु झालीय. आता फडणवीस यांचं नाव अचानक समोर का आलं? का त्यांच्या नावाला पसंती मिळताना दिसतेय? फडणवीस महाराष्ट्रात थांबले तर काय होईल? अशा अनेक गोष्टी यामागं आहेत.
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नुकतीच त्यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परंतु, केवळ भेट घेण्यामुळं ही चर्चा सुरु नाही. तर, त्याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये सर्वात प्रमुख कारण म्हणजे राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा आरक्षण लढ्यामुळं मराठ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. विशेषकरून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ती जास्त आहे. गेल्या अनेक महिन्यांत दररोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस आहेत. लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसला. आणि विधानसभा निवडणुकीतही भाजपाला फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असणं पक्षाच्या हिताचं नाही असा एक सूर पक्षांतर्गत देखील सुरु आहे. हे झालं एक कारण. परंतु, राष्ट्रीय स्तरावर पाहायचं झालं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांशी फडणवीसांचे संबंध चांगले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्यानं संघाच्या शीर्ष नेतृत्वाशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आणि ही बाजु फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान करू शकते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शीर्ष नेतृत्वामध्ये शीतयुद्ध सुरु आहे. आता हे बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भाजपाच्या अध्यक्षपदी संघाला चालणारी व्यक्तीच हवी आहे. त्यामुळं अध्यक्षपदासाठी सूचवलेल्या नावांना संघानं पसंती दिली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांचे मोदी-शाह आणि संघाच्या नेतृत्वाशी चांगले संबंध असल्यानं त्यांच्या नावाला पसंती मिळाल्याची चर्चा आहे.
आता आपण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बघितलं असेल की देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची आणि पक्ष संघटनेत काम करण्याची विनंती पक्षाच्या नेतृत्वाकडं केली होती. त्याचं कारण देखील हेच होतं की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना टार्गेट केलं जात असल्यानं लोकसभा निवडणुकीत त्याचा थेट फटका पक्षाला बसला. फडणवीसांच्या हे लक्षात आल्यानं त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडं ही विनंती केली होती. परंतु, फडणवीसांच्या विनंतीकडं त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आलं. आता मात्र, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होण्याच्या चर्चा सुरु झाल्या.
खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे प्रशासनावर उत्तम पकड असणारे आणि समस्यांची व त्यावरील उपायांची जाण असलेले नेते आहेत. महायुतीत अनेक पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवण्याचा त्यांना अनुभव आहे. 2014 मध्ये महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली. पुढे 2019 सालची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढवली गेली. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असताना मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी युतीतून बाहेर पडल्याचा निर्णय घेतला. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेऊन सकाळी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांचं हे सरकार औट घटकेचं ठरलं. पुढं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीसांनी सरकारला अनेकदा धारेवर धरलं. 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यानंतर एक वर्षाने अजित पवारांना त्यांच्या त्यांच्या पक्षात बंड करून सोबत आणलं. शिवाय काँग्रेसमधील अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याच्या भाजप प्रवेशामागेही देवेंद्र फडणवीसच असल्याचं बोललं जातं. महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात विधानपरिषद आणि राज्यसभेच्या मिळून झालेल्या 3 निवडणुकांमध्ये विरोधकांची मतं फोडून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची किमयाही फडणवीसांनी साधली. या सगळ्या गोष्टींवरून देवेंद्र फडणवीसांचे सर्वच राजकीय पक्षांमध्ये असणारे सलोख्याचे संबंध आणि त्यांचं राजकीय चातुर्यही दिसून येतं… परंतु, हे खरंच त्यांचं राजकीय चातुर्य आहे की, केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर विरोधकांना धमकावून केलेली राजकीय गोळाबेरीज आहे. याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगताना दिसतात. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवणं हा भाजपाचा योग्य निर्णय असेल की, तो त्यांच्या अंगलट येईल हे येणारा काळच ठरवू शकेल.