आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं काँग्रेसपुढं मोठं आव्हान उभं ठाकल्याचं दिसत आहे. निवडणूक लढवण्यासाठी या मतदार संघातून १८ जण इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. इथून कोण कोण इच्छुक आहे…? आणि नेमका पेच काय निर्माण झालाय? हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे सोलापूर मधून विजयी झाल्या. खासदार होण्याआधी प्रणिती शिंदे यांनी तीन वेळा या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आता त्या खासदार झाल्यानं अनेकांनी येथून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. आत्तापर्यंत १८ जणांनी पक्षाकडे उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली आहे. लोकसभेला प्रणिती शिंदे यांना मदत केलेल्या माकपचे नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी देखील सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. त्यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, सुशीलकुमार शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. सोलापूर शहर मध्यची जागा आपल्यालाच मिळणार असं गृहीत धरून त्यांनी आपला प्रचार देखील करायला सुरवात केली आहे.