आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या संख्या काही संपता संपेनात. जागा एक दावे अनेक अशी स्थिती राज्यातल्या जवळपास सगळ्याच मतदारसंघात पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत बंडखोरी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं चित्र दिसत आहेत. रायगड मधल्या तीन विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये सारंकही अलबेल असल्याचं चित्र आहे. आता ते तीन मतदारसंघ कोणते आहेत..? त्या तीन मतदारसंघात कोणत्या पक्षाचे आमदार आहेत..? महायुतीमध्ये अलबेल होण्याचं नेमकं कारण काय..? हेच आपण सविस्तरानं जाणून घेऊ.
रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी कर्जत, अलिबाग आणि महाड या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. तर पनवेल आणि पेण विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे विद्यमान आमदार आहेत. तर उरण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार महेश बालदी विजयी झाले पण त्यांनी नंतर भाजपला समर्थन दिले. परंतु आता रायगड जिल्ह्यातल्या ३ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये सारंकाही अलबेल असल्याचं चित्र आहे. कर्जत खालापूर विधानसभा मदारसंघात शिवसेनेचे महेंद्र थोरवे विद्यमान आमदार आहेत. परंतु या मतदारसंघावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे सुधाकर घारे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत परंतु शेवटी याबाबतचा निर्णय महायुतीचे प्रमुख नेते घेतील. यामुळे या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावेळी वाद होण्याची शक्यता अधिक आहे. आपण जर मागील दोन विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला तर २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश लाड आणि शेकापच्या महेंद्र थोरवे यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश लाड यांनी शेकापच्या महेंद्र थोरवे यांचा 1,900 मतांनी पराभव केला होता. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश लाड यांचा 18,046 मतांनी पराभव केला होता. यामुळे महायुतीच्या संभाव्य फॉर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटल्या येणार त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सुधाकर घारे बंडखोरी करत निवडणूक लढवू शकतात आणि याचा फटका शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांना बसू शकतो. सुधाकर घारे ह्याची ओळख सुनील तटकरे यांचे विश्वासू नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार आणि आक्रमक नेते अशी आहे. ते रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील होते त्यामुळे या मतदारसंघात त्याची ओळख आहे. २०१९ पासून आमदार होण्याचं स्वप्न बघत असलेले सुधाकर घारे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार कि बंड करत निवडणूक लढवावी लागणार हे जागावाटपावेळी स्पष्ट होईलच.
तर दुसरीकडे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात देखील भाजप आणि शिवसेनेत वाद होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत. पण आता या मतदारसंघातून भाजपचे दिलीप भोईर हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आणि याच कारणामुळे या मतदारसंघात काही दिवसांपूर्वी भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद झाला होता. आपण मागील गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचा अलिबाग मतदारसंघाचा इतिहास बघितला तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांचा १६,०९४ मतांनी पराभव केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेकापच्या सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांचा ३२,९२४ मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी हे देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पक्षानी आदेश दिला तर पुन्हा निवडणूक लढवू शकतो असं शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलंय. त्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघाप्रमाणेच अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात देखील जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता अधिक आहे.
तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात काहीस वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. कर्जत खालापूर आणि अलिबाग मुरुड या दोन विधानसभा मतदारसंघात युती धर्म पाळला नाहीतर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू असा इशारा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे या विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांचा 39,621 मतांनी पराभव केला होता. यामुळे रायगड मधल्या दोन विधानसभा मतदारसंघात महायुती धर्म पाळला गेला नाहीतर श्रीवर्धन मध्ये महायुती धर्म आम्ही पाळणार नाही असा थेट इशारा शिवसेनेने दिल्यामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीत मोठा वाद होण्याची शक्यता आहे. महायुतीतील प्रमुख नेते रायगड जिल्ह्यातल्या या तीन मतदारसंघाचा तिढा कसा सोडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..