आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या राजकीय नेत्यांमधील जुने वाद पुन्हा नव्याने समोर यायला सुरवात झाली आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख लढतींमध्ये समावेश असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात दोन राजकीय नेत्यांमधील जुना वाद पुन्हा नव्याने उफाळून येण्याची चिन्ह दिसायला लागलीयत. कोल्हापूर म्हटलं कि, पाटील विरुद्ध महाडिक… महाडिक विरुद्ध मुश्रीफ असे वाद नेहमीच चर्चेचे विषय राहिलेत… आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कागल मध्ये महाडिक विरुद्ध मुश्रीफ यांच्यात वाद रंगण्याची शक्यता आहे.. महाडिक आणि मुश्रीफ यांच्यातील नाराजीचं कारण काय..? याचा फटका कोणाला बसणार..? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
महाडिक विरुद्ध मुश्रीफ यांच्यातील वाद हा काही नवीन नाही.. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक आणि शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांचा 33,259 मतांनी पराभव केला होता. धनंजय महाडिक यांना 6,07,665 मते मिळाली तर शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना 5,74,406 मते मिळाली होती. लोकसभेवर निवडून गेल्यानंतर महाडिक हे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षाच्या प्रचारापासून दूर राहिले होते. त्यामुळं हसन मुश्रीफ यांनी महाडिकांवरील नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यानंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचे नाव चर्चेत होते. परंतु धनंजय महाडिक यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक यांच्यावरील नाराजी बोलून दाखवली होती. परंतु पक्षाकडून पुन्हा एकदा महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत महाडिक आणि शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये मंडलिक यांना 7,49,085 मतं मिळाली तर महाडिक यांना 4,78,517 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांना मदत न केल्यानंच महाडिक यांचा पराभव झाला असं महाडिक समर्थकांनी जाहीरपणे सांगितलं आणि मुश्रीफ यांच्या विरोधात महाडिक समर्थकांत नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. लोकसभेला झालेल्या पराभवानंतर महाडिक यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपानं महाडिक यांना राज्यसभेवर पाठवलं. आणि महाडिक आणि मुश्रीफ हे दोघे विरोधक झाले. परंतु, कालांतरानं राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले. आता महाडिक व मुश्रीफ दोघंही महायुतीत असल्यानं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुश्रीफ आणि महाडिक पुन्हा एकत्र दिसले. मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाडिक आणि मुश्रीफ यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे. आता हा वाद पेटण्याचं कारण काय? तर, धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक यांची अचानक भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी महाडिकांसमोर मुश्रीफांविरोधात तक्रारींचा सपाटाच लावला. हसन मुश्रीफ आम्हाला निधी देत नाहीत, सन्मान देखील देत नाहीत आणि कोणत्या कार्यक्रमालाही बोलवत नाहीत अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. तसंच इथुन पुढे देखील मुश्रीफ असंच वागत राहिले तर आपण काय करायचं असा प्रश्न देखील कार्यकर्त्यांनी यावेळी महाडिकांना विचारला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी तुम्हाला मदत केली नाही त्यांचाच प्रचार करायची वेळ आपल्यावर आली आहे असं म्हणत कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला महायुतीमधून वेगळं करा मग युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांची ताकद समजेल असा इशारा सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महाडिक यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीत महाडिक समर्थक आणि मुश्रीफ यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला तर, मुश्रीफ यांच्या मतात घट होऊ शकते आणि त्याचा त्यांना फटका देखील बसू शकतो.