इस्लामाबाद | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर भर रॅलीत गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत, अशी माहिती दिली जात आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानातील जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने तातडीने निवडणूक घेण्याची मागणी करत लाहोर ते इस्लामाबाद ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढला. त्यांच्या या मोर्चात पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचा मोर्चा ४ नोव्हेंबरला इस्लामाबाद येथे पोहोचणार होता. पण तत्पूर्वी इम्रान खान यांच्यावर गोळीबार झाला आहे. या घटनेत अन्य चौघेजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अटक केली असून, त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.