गांधीनगर | केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर या निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग काँग्रेसने फुंकले आहे. त्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्ता आल्यास 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून, राज्यातील 182 मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामध्ये ही निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला मतदान होईल तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. यात 8 डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
गुजरातच्या निवडणुकांची घोषणा होताच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आहे. खर्गे यांनी गुजरातमधील जनतेसाठीचा जाहीरनामाच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, जर गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, तर नागरिकांना ५०० रुपयांत एलपीजी सिलेंडर देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, ३०० युनीटपर्यंतचे वीजबील मोफत आणि १० लाख रुपयांपर्यंत उपचार आणि औषधेही देण्यात येणार आहेत.