नागपूर | जी-२०च्या परिषदेसाठी नागपूरमध्ये देखील जय्यत तयारी करण्यात येत आहे. येत्या २० मार्चपासून सुरू होणाऱ्या बैठकीसाठी सार्वजनिक ठिकाणी आकर्षक वृक्षांची लागवड, राष्ट्रध्वजांसाठी उभारण्यात आलेले खांब, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहेत. त्यामुळे नागपूरचे चित्रच पालटून गेले आहे.
जी-२०च्या परिषदेसाठी आपल्या देशात येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजवले जात आहे. नागपूर विमानतळापासून तर प्रतिनिधींच्या भेटीस्थळापर्यंतचे विविध मार्ग सुशोभित केले जात आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून विमानतळ परिसरात सुशोभिकरण केले जात आहे. विमानतळातून बाहेर पडल्यापासून जवळपास १ कि.मी. अंतरापर्यंतच्या परिसरात विविध प्रकारची फुलझाडे देखील लावण्यात येत आहेत.
दरम्यान, विमानतळ मार्गावर मोक्याच्या ठिकाणी शिखर परिषदेचे सदस्य राष्ट्रांचे ध्वज लावण्यासाठी दुतर्फा ध्वज खांब उभारण्यात आले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा ८ ते ९ फुट उंचीचे वृक्ष लावण्यात येत आहे. रंगीबेरंगी फुलांची पुष्प वाटिका तयार करण्यात आली आहे. टर्मिनल डोम परिसरात टायगर कॅपीटल आणि संत्रानगरी ही नागपूरची ओळख दर्शविणाऱ्या आकर्षक प्रतिमा येथे साकारण्यात येणार आहेत. करण्यात आलेली ही सजावट कायम राहणार की आलेल्या पाहुण्यांसाठीच नागपूर सजवले आहे हे येणारा काळात स्पष्ट होईल.