पुणे | पुण्यातील अंधजन मंडळ ही सामाजिक संस्था दृष्टीबाधित नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवत असते. या संस्थेच्या वतीने दिनांक ११ मार्च रोजी“आंतरज्योती” ब्रेल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.
यावेळी या मंडळाच्या टेक्नीकल ट्रेनिंग सेंटरमध्ये संपन्न झालेल्या मेळाव्यामध्ये दृष्टिबाधितांच्या कल्याणासाठी प्रेरणादायक कार्य करणाऱ्या आनंद आठलेकर, रवी वाघ, दिलीप शेलवंटे यांचा सन्मान करण्यात आला.
त्याबरोबरच दृष्टीबाधित रसिकांनी यावेळी कविता, गाणी सादर केली तसेच स्वरआकाश,पुणे यांनी मराठी, हिंदी सिनेमातील गाण्यांचा बहारदार कार्यक्रम देखील सादर केला. या संमेलनला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने-अभिनेते, गायक अस्ताद काळे, ख्यातनाम मराठी कथा लेखिका नीलिमा बोरवणकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ उपस्थित होते.
पुणे अंधजन मंडळाचे अध्यक्ष राजेश शहा, विश्वस्त धनराज पाटील, कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मिरा ठाकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
दरम्यान, पुणे अंधजन मंडळ ही सामाजिक संस्था गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळापासून दृष्टिबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करते. दृष्टिहीन निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम,१८ ते ३५ वयोगटातील दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर, डोळ्यांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी अद्यावत हॉस्पिटल या संस्थेमार्फत उभारण्यात आले आहे.