कर्नाटक | आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार कॉंग्रेस आघाडीवार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने सरकार स्थापनेची तयारी देखील सुरू केली आहे. पक्षाला पुरेसे संख्याबळ मिळाल्यास काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या म्हणजेच रविवारी बैठक होऊ शकते.
काँग्रेसची जवळपास 127 जागांवर जवळपास आघाडी दिसून येतीय त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष देखील केला जातोय.कर्नाटकची उपराजधानी आणि सीमावासियांचा आत्मा असलेल्या बेळगावमध्ये काँग्रेसने 18 पैकी 11 जागांवर आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णत: निराशा होताना दिसत आहे. बेळगाव दक्षिण आणि खानापूर या दोन मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीची चुरशीने लढत सुरु आहे. निपाणी मतदारसंघातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.
यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी, ग्रामीण मतदार संघातून लक्ष्मी हेब्बाळकर, गोकाक मतदार संघातून रमेश जारकीहोळी आघाडीवर आहेत. उत्तर मतदारसंघात भाजप आघाडीवर असून भाजपचे डॉ. रवी पाटील आघाडीवर आहेत. खानापूर मतदारसंघात भाजपचे विठ्ठल हलगेकर आघाडीवर आहेत.
काँग्रेसच्या अंजली निंबाळकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर म. ए. समितीचे मुरलीधर पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, कर्नाटकातील काँग्रेसला एकही संधी हातातून निसटून द्यायची नाही यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः तेथे उपस्थित असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, काँग्रेसने प्लॅन बी सुद्धा तयार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना कोणी फोडू नये म्हणून काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे. बहुमतापेक्षा कमी संख्या असल्यास सर्व आमदारांना या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे.
त्याचवेळी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार 224 जागांचे कल आले आहेत. काँग्रेसही यात पुढे जात आहे. काँग्रेस 127 जागांवर पुढे आहे. त्याचवेळी भाजप 68, जेडीएस 22 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर आहेत.