नवी दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यंदा मुलींचा दबदबा पाहायला मिळाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आणि विशेष म्हणजे यामध्ये पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे. इशिता किशोर ही देशांतून पहिली, गरिमा लोहिया दुसरी तर उमा हरति एन ही देशातून तिसरी आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील अव्वल स्थानी एक मुलगीच आहे.
महाराष्ट्रातून ठाण्याची कश्मीरा संखे ही पहिली तर देशातून 25 वी आली आहे. याआधी तिने दोन वेळा प्रयत्न केला होता, परंतु खचून न जाता तिने पुन्हा जिद्दीने अभ्यास करून अव्वल स्थान पटकावले आहे. कश्मीराचे बाबा एका खासगी कंपनीत कामाला आहेत तर तिची आई देखील नोकरी करते.
अंतिम निकालाचा आढावा
अंतिम निकालात एकूण 933 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 345 विद्यार्थी यामध्ये सामान्य (खुला) गटातून 345, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी)154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून 72 उमेदवारांचा समावेश आहे.
लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. तसेच आयएएस पदावर निवड करण्यासाठी 180 विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका 15 दिवसांनी मिळणार असल्याची शक्यता आहे.
हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ www.upsc.gov.in यावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे
दरम्यान एप्रिलपर्यंत 118 विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीच्या फेरीला 30 जानेवारीपासून सुरुवात झाली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते.