रायबरेली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारसभेसाठी सोनिया गांधी उपस्थित होत्या. यावेळी सोनिया गांधी या आपल्या पुत्रासाठी भावुक झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी बोलताना त्यांनी मी माझा मुलगा तुमच्या स्वाधीन करत आहे, तुम्ही जसं मला तुमचं म्हणून सांभाळलं तसं राहुलला देखील सांभाळा. राहुल तुम्हाला निराश करणार नाही याची मी खात्री देते अशी जनतेला भावनिक साद घातली.
त्याचबरोबर गांधी कुटुंबाकडून मला जी शिकवण मिळाली तीच मी राहुल आणि प्रियांका यांना दिली. सर्वांचा आदर करा, एखाद्या कमकुवत घटकासाठी लढायची वेळ आली तर लढा. संघर्षाची तुमची पाळेमुळे आणि परंपरा या मजबूत आहेत. मी तुम्हाला माझा मुलगा सोपवत आहे. जसे तुम्ही मला आपलं मानलं तसेच राहुलला देखील आपलं माना. राहुल तुम्हाला कधीच निराश करणार नाही, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. या सभेमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेदेखील सहभागी झाले होते.
दरम्यान, बऱ्याच दिवसांनंतर मला तुमच्यात येण्याची संधी मिळाली म्हणून मी आनंदी आहे. खासदार या नात्याने मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली ते माझ्यासाठी खूप मोठे भांडवल आहे. गेल्या शंभर वर्षांपासून आमच्या घराण्याची पाळेमुळे या मातीशी जोडली गेली आहेत. इंदिरा गांधी यांच्या मनात रायबरेलीसाठी वेगळे स्थान होते. त्यांचे तुमच्यावर अतिव प्रेम होते अशी इंदिरा गांधी यांची आठवणही सोनिया गांधी यांनी काढली आहे.