मुंबई | दिवाळीचा सण (Diwali festival) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वसामन्यांना अनेकदा महागाईचा फटका बसला आहे. अशातच तूर डाळ गेल्या आठवड्याभरात ४ ते ५ रुपयांनी महागली आहे. त्यासोबतच उडीद डाळ आणि खाद्य तेलाच्या किंमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. ठोक बाजारासह किरकोळ बाजारावरही डाळींच्या किंमतींचा परिणाम जाणवू लागला आहे. उत्पादन घटण्याच्या भीतीने डाळींची दरवाढ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
सध्या तूर डाळीचा ठोक बाजारातील दर हा ११०रुपये प्रति किलो झाला आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत १२५ ते १३० रुपये किलो इतकी झाली आहे.
त्याचप्रमाणे, आधी उडीद डाळ ९७ ते १०० रुपये किलो इतक्या दराने मिळत होती. मात्र आता उडीद डाळीचा दर १०५ ते ११० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या दरांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे डाळींच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डाळींच्या पिकामध्ये यंदा घट होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम डाळींच्या वाढत्या किंमतींमध्ये दिसून येत आहे.
रुपयांचे मूल्यही घसरल्यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत खाद्यतेल ३ ते ४ रुपयांनी महागले असून त्यामध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.