पुणे | देशभरातील ३५० चित्रकारांच्या निवडक चित्रांचा समावेश असलेल्या चित्र प्रदर्शनाचे ‘नवकार आर्ट फाउंडेशन’तर्फे आयोजन करण्यात आले आहे. प्राचीन जैन कलेच्या उत्तम कलाकृतींचा समावेश असलेले हे चित्र प्रदर्शन येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात सुरु असणार आहे. कलेचे रसिक असलेल्या पुणेकरांसाठी मेजवानी असलेल्या या चित्र प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात सुरु असलेले हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये ७ वर्षांवरील चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. शनिवारी जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. देशभरातून आलेल्या या चित्रकारांना आशीर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, चित्रकार सुरेश लोणकर, उल्हास वेदपाठक, निवास कन्हेरे, मुकीम तांबोळी, सतीश चव्हाण, सुनील हंबिर तसेच जीतो पुणेचे महिला अध्यक्ष लकीशा मर्लेचा उपस्थित होते. देशाच्या विविध शहरांमध्ये आतापर्यंत सहा वेळा हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे दुर्लभ होत चाललेली कलाकृती जोपासण्यामध्ये महत्वपूर्ण हातभार लावण्याचे काम या संस्थेकडून केले जात आहे.
देशभरातील जैन समाजातील चित्रकार, शिल्पकार आणि इतर कला क्षेत्रात प्रावीण्य असलेल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्या कलेला एक वेगळी ओळख देण्याचे काम नवकार आर्ट फाउंडेशनतर्फे केले जात आहे. याबरोबरच जैन समाजातील या कलाकारांची जागतिक पातळीवर ओळख निर्माण करून देण्यासाठीही ‘नवकार आर्ट फाउंडेशन’ गेल्या सात वर्षांपासून ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर काम करत आहे. ह्या संस्थेचे कार्यकारी मंडळी मनसुख छाजेड़ (संस्थापक), संजय संचेती, किर्ती ओसवाल, प्रतिभा दुगड़, रौशनी नहार, प्रेरणा ओस्तवाल या आहेत.