मुंबई | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला निवडणूक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह दिले होते. परंतु या चिन्हाला शीख समाजाने विरोध केला आहे. हे चिन्ह शीख समाजाचं प्रतिक आहे म्हणून नांदेडच्या सचखंड गुरुद्वारचे माजी सदस्य रणजीत कामठेकर (ranjit kamthekar) यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला देऊ नये, अशी विनंती करून आक्षेप दर्शवला आहे. त्यांनी या पत्राद्वारे ‘ढाल-तलवार’ हे आमचे धार्मिक चिन्ह आहे. या चिन्हाची पूजा पाचही तख्तांवर केली जाते, असे कामठेकर यांनी म्हटले आहे.
धार्मिक चिन्ह असल्यामुळे ज्याप्रमाणे ‘त्रिशुळ’ या चिन्हाला बाद ठरवण्यात आलं, त्याचप्रमाणे ‘ढाल-तलवार’ या चिन्हालाही रद्द करण्यात यावं, अशी मागणी कामठेकरांनी केली आहे. यासंदर्भात निर्णय न झाल्यास न्यायालयात जाऊन न्याय मागू असेदेखील त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला मिळालेली चिन्ह वादात सापडली आहेत. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षानं दावा केला आहे.
दरम्यान, निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने ‘तळपता सूर्य’, ‘ढाल-तलवार’ आणि ‘पिंपळाचे झाड’ असे तीन पर्याय आयोगाला सादर केले होते. त्यापैकी ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे. तर ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाला दिलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि ढाल आहे. ‘तळपता सूर्य’ या शिंदे गटाच्या पहिल्या पसंतीच्या चिन्हाला निवडणूक आयोगाने नाकारलं. उगवता सूर्य हे तामिळनाडूतील डीएमके आणि मिझोराम नॅशनल पक्षाचं चिन्ह आहे. त्यानंतर आता शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवारीवरुन राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.