मुंबई | राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट दिलं असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं ऑक्टोबरचं वेतन दिवाळीपूर्वीच होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे त्याच्या आधीच कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. दिवाळीपूर्वीच 21 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात यावेत असा आदेश सर्व आस्थापनांना देण्यात आला आहे. अशा प्रकारची मागणी या आधीच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षण संस्था, महाविद्यालयं आणि इतर सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे. यंदा दिवाळी ही 22 तारखेपासून सुरू होणार असून त्यापूर्वी म्हणजे 21 तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे.
मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना राज्य सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना 22 हजार 500 रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाणार आहे.