पुणे | पुण्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. हा पाऊस ढगफुटीसदृश्य असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्यावर हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, ‘हा पाऊस ढगफुटीसदृश पाऊस नसून तीव्र स्वरूपाचा पाऊस होता. कालपेक्षा आज दुपारनंतर व सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला. तसेच 1.5 ते 6.4 सेंटीमीटर पाऊस अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
कश्यपी पुढे म्हणाले की, पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व बंगाल आणि लगतच्या भागत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत याचं चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान १० ते १५ मिनिटे पावसाच्या तीव्र सरींची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात २२ ऑक्टोबरपर्यंत अनेक शहरांतून परतीच्या पावसाचा प्रवास ८५ ते ९० टक्के पूर्ण होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री साडेआठ ते साडेअकरा यादरम्यान प्रत्येक तासाला किमान तीन सेंटीमीटरपर्यंत पाऊस झाला. हा तीव्र सरासरी पाऊस असल्याचेही त्यांनी सांगितले.