पुणे | सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुजित पटवर्धन यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे निधन झाले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सार्वजनिक वाहतूक सक्षम व्हावी यासाठी गेले वीस वर्षाहून अधिक काळ ते प्रयत्नशील होते. बीआरटी, पदपथ, सायकल ट्रॅक, हवेची गुणवत्ता, नदी सुधार हे त्यांच्या जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय होते.
शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी त्यांनी 1980 मध्ये परिसर या संस्थेची स्थापना केली होती. शहरातील सायकल ट्रॅकची दुरवस्था आणि त्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही ते गेली अनेक वर्षे महापालिकेकडे पाठपुरावा करीत होते.
पटवर्धन हे व्यवसायाने प्रिंटर होते. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यास त्यांनी इंग्लंडमध्ये केला होता. तेथून परतल्यावर पुण्यात नारायण पेठेत ‘मुद्रा’ ही प्रिंटिंग प्रेस त्यांनी स्थापन केली होती. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी वापरले होते.