अखिल राजस्थानी समाज संघ पुणेच्या वतीने आंदोलनाचा इशारा
पुणे | पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सुमारे ८ ते १० लाख राजस्थानी समाज वास्तव्यास आहे. व्यापार, व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने राजस्थानहून पुण्यात आलेल्या नागरिकांना जोधपूरला जाण्यासाठी आठवड्यातून एकदाच रेल्वे आहे. त्यामुळे पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे ही रेल्वे दररोज सुरु करावी, या मागणीसाठी अखिल राजस्थानी समाज संघ, पुणेच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवसह अनेक मान्यवरांची भेट घेतली आहे. ही रेल्वे सुरु करण्यासंबंधी आश्वासन मिळाले असली तरी ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळं पुणे ते जोधपूर दररोज रेल्वे च्या मागणीसाठी राजस्थानी समाज सोमवारपासून (दि.१६ जानेवारी) आमरण उपोषण करणार आहे. हे उपोषण पुणे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ केले जाणार असल्याची माहिती अखिल राजस्थानी समाज संघाकडून देण्यात आली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी अखिल राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष ओमसिंह भाटी, पुणे जिल्हा रिटेल व्यापार संघटनेचे अध्यक्ष सुनील गेहलोत, राजस्थानी सुतार समाजाचे अध्यक्ष मोहनलाल सुतार, पालिवाल ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष सुरजमल पालिवाल, कुमावत समाजाचे अध्यक्ष केसाराम कुमावत, कार्याध्यक्ष राधेशाम कुमावत, राजस्थानी माळी समाज, पुणेचे अध्यक्ष नरेश सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे रेल्वे दररोज सुरु करावी, या मागणीसाठी अखिल राजस्थानी समाज संघाने वेळोवेळी भेट घेऊन मंत्री, अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. २०१६ मध्ये महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनाही निवदेन दिले होते. पण आमची मागणी अद्यापपर्यंत मान्य झालेली नाही. दिल्लीमध्ये नुकतीच केंद्रीय संसदीय कार्य आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यांनी ही रेल्वे सुरु करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, यावर तातडीने कार्यवाही करून ही रेल्वे दररोज सुरू करावी, या मागणीसाठी अखिल राजस्थानी समाज संघ आग्रही आहे.
…तर १६ जानेवारीपासून उपोषण : ओमसिंह भाटी
पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे रेल्वे दररोज सुरु करावी यासाठी गेल्या ६ वर्षांपासून ही मागणी करत आहोत. पण आमची मागणी मान्य केली नाही. आमची रेल्वेमंत्र्यांना आणि भारत सरकारला विनंती आहे की आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही १६ जानेवारीला आमरण उपोषण करणार आहोत. तसेच २१ जानेवारीपासून जनआंदोलनही करणार आहोत. रेल्वेमंत्री, संसदीय कार्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनाही निवेदन दिले आहे. अद्यापपर्यंत आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ही रेल्वे दररोज सुरु करावी. अन्यथा राजस्थानी समाजाच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाटी यांनी दिला.
हा मूलभूत प्रश्न, तातडीने निर्णय घ्यावा : अचल जैन
पुणे आणि परिसरात राजस्थानमधून आलेल्या लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. लग्नकार्य असेल किंवा इतर काही कार्यक्रमासाठी राजस्थानला जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणी येतात. हा मूलभूत प्रश्न असून, त्यावर निर्णय घेऊन पुणे ते जोधपूर रेल्वेसेवा त्वरीत सुरु करावी, अशी मागणी सकल जैन समाज संघ पुणेचे अध्यक्ष अचल जैन यांनी केली.
…तर सरकारला मोठा आर्थिक फायदा : सुनील गेहलोत
पुण्यात सध्या ७ ते ८ लाख राजस्थानी नागरिक राहत असून, दररोज ८० ते १०० गाड्या पुणे ते जोधपूर सुरु आहेत. बसेसचे भाडे जास्त असल्याने तेही परवडत नाही. सुट्ट्यांच्या कालावधीत तर एका तिकिटासाठी सहा हजार घेतले जातात. रेल्वेचा प्रवास सुखाचा प्रवास आहे. ही रेल्वे दररोज सुरु केली तर सरकारला याचा मोठा आर्थिक फायदा मिळू शकेल. आम्ही सर्व संघटनांनी विनंती करूनही त्याला यश मिळाले नाही. पण आता ही रेल्वे दररोज सुरु करावी, अशी आमची सरकारला विनंती आहे.
सरकारने लवकर निर्णय घ्यावा : मोहनलाल सुतार
राजस्थानी समाज मोठ्या संख्येने राजस्थानला जात असतो, तेथून येत असतो. पण या लोकांना जाण्या-येण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्याने गैरसोय होत आहे. हा प्रवास १८ ते २० तासांचा असून, इतका मोठा प्रवास व्यवस्थित झाला नाही तर जीवितहानी होऊ शकते. याचे गंभीर परिणाम त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागतात. त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती आहे, असे मोहनलाल सुतार म्हणाले.
सरकारने गांर्भियाने दखल घ्यावी : नरेश सोलंकी
पुणे ते जोधपूर ही रेल्वे सुरु करावी. पुणे शहर आणि परिसरात साधारण १० लाख नागरिक राहतात. दररोज येथील हजारो नागरिक राजस्थानला जातात आणि तेवढेच राजस्थानातून पुण्यात येतात. त्यामुळे केवळ बससेवा आणि आठवड्यातून केवळ एकदाच रेल्वेसेवा एवढ्याशा साधनांवर लोकांना ये-जा करता येणे शक्य नाही. हे मूलभूत प्रश्न आहेत. पण या गोष्टींची सरकारने गांभिर्याने दखल घ्यावी आणि ही रेल्वेसेवा दररोज सुरु करावी, अशी मागणी सोलंकी यांनी केली आहे.
नियमित रेल्वे सुरु केल्यास अपघात टळू शकतात : सुरजमल पालिवाल
राजस्थानचा पुण्यापासून १८ ते २२ तासांचा प्रवास आहे. दररोज जाणाऱ्यांची संख्या हजारोंची आहे. रेल्वेसेवा असेल तर एका रेल्वेत अडीच हजारच्या आसपास लोक ये-जा करू शकतात. त्यामुळे बस आणि इतर खाजगी वाहनातून होणारी संख्या कमी होऊ शकते. होणारे अपघात टळू शकतात. जीवितहानी वाचू शकते. त्यामुळे याचा विचार करून राजस्थानी समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करावी, असे पालिवाल यांनी सांगितले.
सध्याची वाहतूक व्यवस्था तोकडी : केसाराम कुमावत
पुणे शहर आणि परिसरात व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि नोकरी निमित्ताने राजस्थानी समाज लाखोंच्या संख्येने येथे राहतो. जरी येथे स्थायिक झाले असले तरी त्यांचं मूळ राजस्थानात आहे. धार्मिक विधी, कौटुंबिक कार्यक्रम, सण-उत्सव निमित्ताने हा समाज नियमितपणे राजस्थानला जात असतो. पण सध्याची वाहतूक व्यवस्था तोकडी आहे. विमानसेवा परवडत नाही आणि ती थेटही नाही. सरकारने यावर विचार करून आमची मागणी मान्य करावी, असे कुमावत यांनी म्हटले आहे.
लांबपल्ल्याचा प्रवास अधिक धोकादायक : राधेशाम कुमावत
राजस्थानला जाण्यासाठी गुजरातमधून जावं लागतं. त्या रेल्वेत गुजरातचेही प्रवासी असतात. परिणामी, राजस्थानच्या मूळ नागरिकांना आरक्षण मिळत नाही. त्यात आठवड्यातून एकच रेल्वे असल्याने बस किंवा खाजगी गाड्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे रस्त्यांवर गाड्यांचे प्रमाण जास्त असते. लांबपल्ल्याचा प्रवास अधिक धोकादायक होतो. अपघाताच्या घटना घडल्या की कुटुंब अस्ताव्यस्थ होतं. त्यामुळे याचा सरकारने गांभिर्याने विचार करून दररोज रेल्वेसेवा सुरु करावी, ही आमची मागणी असल्याचे राधेशाम कुमावत यांनी सांगितले.