मुंबई | येत्या 30 जानेवारीला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक होत आहे. पण सध्या चर्चा आहे ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची. या मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी अर्ज न भरता त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. या अनपेक्षित अशा राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर काँग्रेसने सत्यजित तांबेंना पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नाशिक निवडणुकीबाबत आम्ही हायकमांडकडे अहवाल पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. मात्र, बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र, सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली आहे, असा आरोप केला.
भाजप भय दाखवून घरं तोडण्याची कामं करतंय
विधान परिषद निवडणुकीबाबतच्या सर्व घडामोडींबाबत आम्ही हायकमांडला कळवले आहे. सगळा ठरलेला कार्यक्रम होता. भाजपने त्याठिकाणी फॉर्म भरला नाही. त्यामुळे पदवीधर मतदार अडाणी नाहीत. त्यांना सगळं कळतंय. भाजप भय दाखवून घरं तोडण्याची कामं करतंय, असेही पटोले यांनी सांगितले.