मुंबई | दोन दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यानंतर लगेचच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. अमूलने दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे जनतेला महागाईचा मोठा धक्का बसला आहे. दरात वाढ केल्याचं निवेदन अमूलने जारी केलं आहे. दूधाचे वाढलेले दर आजपासूनच लागू होणार आहेत.
कंपनीने सांगितल्याप्रमाणे, आता अमूल ताजाचं अर्धा लिटर दूध २७ रुपयांना मिळणार तर १ लिटर पॅकेटसाठी ५४ रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गोल्ड अर्थात फुल क्रीम दुधाचे अर्धा किलोचे पॅकेट आता ३३ रुपयांना तर १ लिटरसाठी ६६ रुपये मोजावे लागतील. अमूल गायीच्या १ लिटर दुधाचा दर ५६ रुपयांवर पोहोचला आहे. अर्ध्या लिटरसाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हशीचे A2 दूध आता ७० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली होती. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.
त्याचबरोबर काँग्रेसने ‘अच्छे दिन’ असा उल्लेख करत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्वीट केलं आहे की, “गेल्या १ वर्षात अमूलने दुधाच्या दरात प्रतिलिटर ८ रुपयांनी वाढ केली आहे.”