मुंबई | फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (FAM) चा ४५ वा वर्धापन दिन आणि व्यापारी एकता दिन २५ मे रोजी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृह येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्यातील व्यापारी, जयराज ग्रुपचे संचालक व फॅमचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस व पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राजेश शहा हे गेली नऊ टर्म म्हणजे २० वर्षे फॅमचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. फॅमच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात फॅम संघटनेला सर्वदूर पोहचवण्याचे काम शहा यांनी केले आहे. याच भागातील लहान मोठ्या ट्रेडिंग व्यापाऱ्यांचे ते नेतृत्व करतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या कार्यकारिणीची निवड काही दिवसांपूर्वी झाली. या नवीन कार्यकारिणीचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागातील विविध क्षेत्रातील संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच व्यापारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.