पुणे | व्यापारी वर्गाची मातृसंस्था असलेल्या दि पूना मर्चंट चेंबरला राज्यस्तरीय बिझनेस एक्स्प्रेस पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १ जून रोजी सांगली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सांगलीच्या बिझनेस एक्स्प्रेस फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी व्यापार, उद्योग, सहकार, बँकिंग, शैक्षणिक, सामाजिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा पुरस्काराचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे यापूर्वी अनेक नामवंत व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
दरम्यान, यंदा दि पूना मर्चंट चेंबर या संस्थेने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या ७५ वर्षांत व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दि पूना मर्चंट चेंबरची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे मत दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी व्यक्त केले.