युगल धर्म संघाच्या युथ विभागाच्या पहिल्या मेळाव्याचे आयोजन
पुणे | कोणतीही गोष्ट, कोणतेही काम सुरु करण्यासाठी त्यात जीवतोड मेहनत करावी लागते. परंतु, हे सुरु केलेले काम पुढे चालु ठेवण्यासाठी त्यापेक्षाही अधिक मेहनत, कष्ट करावे लागते. त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन जमायलाच हवे. वेळ ही काही वेगळी गोष्ट नाही. वेळचे व्यवस्थापन म्हणजे आपले स्वतःचे व्यवस्थापन होय. विचार स्पष्ट असतील, निर्णयावर ठाम असाल आणि सर्वोत्तम घडविण्यासाठी कष्टामध्ये सातत्य असेल तर, तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते व व्यवसाय मार्गदर्शक मनीष गुप्ता यांनी केले.
युगल धर्म संघाच्या युथ विभागाची सुरुवात नुकतीच झाली असून त्यांचा पहिलाच मेळावा रविवारी संपन्न झाला. यावेळी मनीष गुप्ता व सॅन्ते रेस्टॉरंटच्या प्रमुख सोनल बारमेचा यांनी युवकांना मार्गदर्शन केले. युगल धर्म संघाचे अध्यक्ष विजय भंडारी यावेळी उपस्थित होते. पहिल्याच मेळाव्यात युथ विभागाच्या सदस्यांची फॅशन, उत्पादन व बांधकाम या तीन टीममध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यांना २० मिनिटांमध्ये विचार करून एक व्यवसायाची कल्पना वास्तवात कशी राबविली जाऊ शकते याविषयीचे टास्क देण्यात आले होते.
आयुष्यात सुरुवात महत्वाची असते. आणि आयुष्य श्रीमंत करण्यासाठी अशा अनेक सुरुवाती होणे आवश्यक असते. या सुरुवातीच्या काळात धक्का मिळावा लागतो. आधार मिळावा लागतो. परंतु, जो सातत्य ठेवून काम करतो त्यालाच धक्का अथवा आधार मिळतो. समाजामध्ये असे अनेक मान्यवर आहेत जे अशा कष्टाळू लोकांना धक्का देण्यासाठी इच्छुक असतात. त्यांच्यासमोर आपले काम जाण्याची, आपण जाण्याची गरज असते, असेही मनीष गुप्ता यांनी सांगितले.
सोनल बारमेचा म्हणाल्या की, यश हे सहज मिळत नाही. त्यासाठी तुमची इच्छा प्रबळ असावी लागते. आत्मविश्वासाने कष्ट करण्याची आवश्यकता असते. तुमच्या कामात सातत्य पाहिजे. आपण आपल्या क्षेत्रातील ट्रेंड सेटर कसे होऊ याचा विचार आपण केला पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. आणि व्यापक दृष्टीकोन ठेवून भागिदारीमध्ये व्यवसायाला पुढे नेण्याची क्षमता ठेवली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
ही मुलं उद्याचं उज्ज्वल भविष्य
आपल्या नेक्स्ट जनरेशनला संधी देण्याचे काम आपण केले पाहिजे. युवा पिढीकडे खूप कल्पकता आहे. त्यांना संधी मिळाली तर, ते आपल्या देशाचे आणि पर्यायाने विश्वाचे कल्याण करू शकतील. आणि याच उद्देशाने युगल धर्म संघ समाज व देशाच्या कल्याणासाठी सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून युवा पिढीचा स्वतंत्र विभाग याठिकाणी स्थापन केला आहे. ही मुलं उद्याचं उज्ज्वल भविष्य निर्माण करतील, असा मला विश्वास आहे.
- विजय भंडारी (अध्यक्ष, युगल धर्म संघ)