मुंबई | राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट वेगळे झाले आहेत. त्यातच आता अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटासह भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी ठाकरे गटाने ‘प्लॅन बी’ अवलंबला आहे. त्यानुसार, संदीप राजू नाईक यांचाही डमी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनीही हजेरी लावली होती. ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज कोणत्याही कारणास्तव बाद ठरला जाऊ नये, यासाठी ठाकरे गटाने प्लॅन बी अवलंबला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी दाखल केली. मात्र, यावेळी ठाकरे सावध पावलं टाकताना दिसत आहेत.
कोण आहेत संदीप नाईक?
संदीप नाईक हे युवासेनेचे पदाधिकारी आहेत. याशिवाय रमेश लटके यांचे ते निकटवर्तीय आहेत. अंधेरीचे ते माजी नगरसेवकही आहेत. रमेश लटके यांच्यासोबत ते मतदारसंघात सक्रिय होते. त्यांचा फायदा या निवडणुकीत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.