मुंबई | राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हे समीकरण पाहिला मिळत आहे. या पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत ‘घड्याळ’ थांबवायचं, वरळीतील समुद्राचे पाणी घेऊन ‘मशाल’ विझवायची आहे, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.
मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांचे हाल झाले पाहिजेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत ‘घड्याळ’ थांबवायचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मतदारसंघ असलेल्या भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये ‘पंजा’ थांबवायचा आणि वरळीतील समुद्राचे पाणी घेऊन ‘मशाल’ विझवायची’.
शिवसेनेबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, काँग्रेसची संस्कृती विरासत स्वीकारली. या मशालीने सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे विचार स्वीकारले आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेत सहकार्य केलं आहे. हिंदुत्व आणि मराठी माणसांचा विचार न करता काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घेतली. मशालीची पकड काँग्रेसच्या हातात आहे आणि त्या हाताला घड्याळ आहे, असा टोलाही लगावला.