मुंबई | अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके हे बिनविरोध विधानसभेत जाणार हे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंधेरीच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात येत होती. त्यानुसार पटेल यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच राजकीय स्तरावर चर्चा होती. त्यातच सोमवारी (दि.17) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर अखेर भाजपने आपला उमेदवार लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पत्र लिहिले होते. त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या. अखेर भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्याची घोषणा केली आहे.