मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर टीका केली. ‘अब्दुल सत्तार हा हिरवा साप आहे. त्याला पूर्णपणे गाढल्याशिवाय मी राहणार नाही’, असे खैरे म्हणाले.
ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे ओला दुष्काळ पाहण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सत्तार यांनी त्यांचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ म्हणून केला होता. यावरूनच चंद्रकांत खैरे चांगले संतापले. ते म्हणाले, ‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत अब्दुल सत्तारांना गाढण्याचं काम मी करणार आहे. काहीही केलं तरी त्याला निवडून येऊ देणार नाही. त्याने अनेकांना लुबाडलं आहे. अनेक मुस्लिमांच्या जमिनीही त्याने हडपल्या आहेत. अब्दुल सत्तार हा हिरवा साप आहे’, अशा एकेरी शब्दांत सत्तार यांना टोला लगावला.
दरम्यान, अब्दुल सत्तारांचा बेशिस्तपणा तुम्हाला आवडतो का? मंत्रिमंडळात सत्तारांसारखे मंत्री असल्याने तुमच्या सरकारचं नाव बदनाम होत आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांना ताबोडतोब काढून टाकलं पाहिजे, अशी मागणी मी फडणवीसांकडे करतो, असेही खैरे यांनी म्हटले आहे.